कर्मयोगी
आज नानांना खूप उशिरा जाग आली, नेहमी पाच वाजता उठायची सवय पण काल रात्री झोपच येतं न्हवती आणि रात्री कधीतरी उशिरा डोळा लागला होता. लवकर लवकर आटपून ते नेहमी प्रमाणे मॉर्निंग वॉक ला निघाले, बरोबर कधीपासून वाट बघत बसलेला टॉमी होताच. आज वेळ चुकल्या मुळे म्हणा कदाचित सगळं कसं वेगळं वाटत होतं, रस्ता तोच पण माणसं वेगळी, प्रत्येकजण आपल्या धावपळीत, कोणी ऑफिसला जायच्या धावपळीत तर कोणी मुलांना शाळेत सोडायच्या धावपळीत. नेहमीचा फेरफटका मारून नाना उद्यानात आपल्या नेहमीच्या बाकावर बसले, मन मात्र जागेवर न्हवते ते केव्हाच भूतकाळात जाऊन पोचले होते. प्रख्यात मल्टि नॅशनल कंपनी मधून व्हाईस प्रेसिडेंटच्या पदावरून नाना निवृत्त झाले होते, एके काळी त्यांचा एक एक मिनिट मौल्यवान होता. महिन्यातून एक दोन फॉरेन टूर, आणि बाकी सर्व वेळ मिटिंगनें भरलेले कॅलेंडर, त्यांची सेक्रेटरी हे सर्व पाळता पाळता स्वतः थकून जात असे. नानांना ऑफिस मध्ये मान पण तेव्हडाच होता, कंपनीला बिलियन डॉलर कंपनी बनवण्यामध्ये नानांचा फार मोठा हात होता आणि नांनानी आयुष्यातील पुरी पस्तीस वर्ष कंपनीला दिली होती. मॅनेजमेंट ट्रेनीं ते व्हाईस प्रेसिडेंट ...