कर्मयोगी

आज नानांना खूप उशिरा जाग आली, नेहमी पाच वाजता उठायची सवय पण काल रात्री झोपच येतं न्हवती आणि रात्री कधीतरी उशिरा डोळा लागला होता. लवकर लवकर आटपून ते नेहमी प्रमाणे मॉर्निंग वॉक ला निघाले, बरोबर कधीपासून वाट बघत बसलेला टॉमी होताच. आज वेळ चुकल्या मुळे म्हणा कदाचित सगळं कसं वेगळं वाटत होतं, रस्ता तोच पण माणसं वेगळी, प्रत्येकजण आपल्या धावपळीत, कोणी ऑफिसला जायच्या धावपळीत तर कोणी मुलांना शाळेत सोडायच्या धावपळीत. नेहमीचा फेरफटका मारून नाना उद्यानात आपल्या नेहमीच्या बाकावर बसले, मन मात्र जागेवर न्हवते ते केव्हाच भूतकाळात जाऊन पोचले होते.

प्रख्यात मल्टि नॅशनल कंपनी मधून व्हाईस प्रेसिडेंटच्या पदावरून नाना निवृत्त झाले होते, एके काळी त्यांचा एक एक मिनिट मौल्यवान होता. महिन्यातून एक दोन फॉरेन टूर, आणि बाकी सर्व वेळ मिटिंगनें भरलेले कॅलेंडर, त्यांची सेक्रेटरी हे सर्व पाळता पाळता स्वतः थकून जात असे. नानांना ऑफिस मध्ये मान पण तेव्हडाच होता, कंपनीला बिलियन डॉलर कंपनी बनवण्यामध्ये नानांचा फार मोठा हात होता आणि नांनानी आयुष्यातील पुरी पस्तीस वर्ष कंपनीला दिली होती. मॅनेजमेंट ट्रेनीं ते व्हाईस प्रेसिडेंट हा प्रवास इतका सोप्पा न्हवता पण तो नांनानी आपल्या हुशारी आणि प्रचंड मेहनतीच्या जोरावर पार केला होता. पण हा प्रवास करता करता खूप काही हातातून सुटून पण गेलं होतं.

स्वतःला त्यांनी कंपनीसाठी वाहून दिले होते, सात वेगवेगळ्या देशामध्ये प्रोडक्शन चालू करण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली होती, ह्या कामामुळे प्रचंड प्रवास नशिबात आला होता, आयुष्यातील उमेदीचा काळ बाहेर घालवून पर्सनल लाईफ खऱ्या अर्थाने जगायचं राहूनच गेलं होतं. मुलं लहानाची मोठी होताना दुरूनच बघणं झालं होतं आणि त्यांच्या शाळेतील महत्वाच्या सांभारंभामध्ये उपस्थित राहणे पण खूप कमी जमलं होतं. परिवाराला खूप कमी वेळ दिला होता पण नानी खूप खंबीर म्हणून तिने एकटीने संसार पुढं चालवला होता आणि मुलांना कशाची कमी पडून दिली न्हवती. आज दोन्ही मुलं अमेरिकेला सेटल झाली होती. आज नानांना नानीची खूप कमी भासत होती, दोन वर्षांपूर्वीच आपल्या दोन्ही मुलांची लग्न उरकल्यावर समाधानाने नानी अल्पशा आजाराने देवाघरी गेली होती. आणि आता फक्त नाना एकटे राहिले होते आणि नाही म्हटलं तर सोबतीला होता त्यांचा टॉमी. 

रिटायर झाल्यानंतर पण नानांनी कामं करणे सोडलं न्हवत, अनेक कंपन्यांसाठी त्यांनी कॅन्सल्टन्ट म्हणून काम चालू ठेवलं होतं पण प्रवास आता झेपत न्हवता म्हणून घरून जेवढं जमेल तेवढंच ते काम करत होते, आतापर्यंत वीस नवीन स्टार्टअप कंपन्या चालू करण्यासाठी त्यांनी मदत केली होती आणि त्यातील पाच कंपन्यावर ते इंडिपेंडंट डायरेक्टर म्हणून पण नियुक्त झाले होते आणि त्या कामामध्ये पण ते खूप व्यस्त असायचे.  

मॉर्निंग वॉक संपवून ते लवकर लवकर घरी निघाले कारण आज एका नव्या प्रोजेक्ट संदर्भात एक ऑनलाईन मिटिंग होती. पुरा दिवस असाच कामात आणि थोडा आराम करण्यात गेला पण आता त्यांना कामामुळे खूप थकवा यायला लागला , मुलांची आठवण प्रकर्षाने येऊ लागली आणी त्यांनी रात्री जागून मोठ्या मुलाला फोन लावला, समोरून खेकसतच "डॅड आय एम ईन मिटिंग ईस थेअर एनीथिंग अर्जंट " म्हणून मुलाने विचारणी केली, नांनानी काही नाही म्हणून फोन ठेवला, लहान मुलाला फोन करायची मग हिम्मतच नाही झाली. आजकल असेच होतं होते मुलं नेहमी बिझी असतं त्यांच्या वेळेनुसार फोन करायला खूप जागायला लागत असे तरीपण मुलांबरोबर बोलण होईल ह्याची खात्री कमीच, शनिवारी रविवारी कधी मुलांचा फोन यायचा आणि बोलायला चान्स मिळायचा.

पावसाळा चालू झाला होता हवेतील गारवा आता जास्तच बोचरा वाटायला लागला होता, नानीनें दिलेले आवडते स्वेटर दिवसा घालणे चालू झाले होते, गणपतीचा सण जवळ येतं होता आणि त्याची तयारी करायची होती, हे सर्व करण्याची नानांना सवयच न्हवती कारण नानी सर्व सांभाळायची.गणपतीला सर्व परिवारा सोबत सण साजरा करण्याची नानाची आणि नानी ची खूप वर्षांपासून इच्छा होती पण ते कधी शक्यच नाहीं झालं कारण मुलं कधी पोचूच शकली नाहीत. मोठ्या मुलाला एक मुलगा पण झाला होता पण त्याला फक्त व्हिडीओ कॉल मध्येच बघणे झाले होते. गणपती नाही तर निदान दिवाळी सर्व परिवारा सोबत साजरी करावी असं वाटतं होतं पण ते पण अजून कधी जमलं न्हवत. ख्रिस्मसच्या सुट्टीत एकदा दोन्ही मुलं आठवडाभर राहून गेली होती त्यावेळी नानीच्या आनंदाला उधाण आलं होतं, काय काय बनवलं होतं तिनं दोन्ही मुलांसाठी पण आता नानी पण नसल्यामुळे तो पण आनंद मुलांना मिळणे शक्य न्हवतं.

गणपती गेला, दसरा गेला दिवाळी आली, आता गुलाबी थंडी पण चालू झाली जी नानांना जास्तच असह्य होऊ लागली, नांनाना आता कामं करताना जास्त थकवा येऊ लागला, त्यांची तीव्र बुद्धिमत्ता, तीक्ष्ण मेमरी कुठे तरी कमी पडतेय असं त्यांना वाटू लागलं, शरीरासोबत मन जास्त थकत होतं. हाती घेतलेले प्रोजेक्ट तसें संपत आले होते आणि नवीन आलेल्या प्रोजेक्टना आपण योग्य न्याय देऊ शकत नाही असे समजून सध्या होल्ड वर ठेवलं होतं. काही कंपनींच्या इंडिपेंडंट डायरेक्टर पदाचा कार्यकाळ दोन महिन्यात संपणार होता आणि कंपन्या तो पुन्हा वाढवायला मागे लागल्या होत्या पण नांनानी तिथे पण अजून होकार भरला न्हवता,  आधी सर्व हाती घेतलेली कामं संपवण्यावर त्यांनी भर दिला होता. डिसेंबरला ख्रिस्मसची सुट्टी लागणार होती, मुलांना बोलावता येईल का असा एक विचार त्यांच्या मनात आला आणि एके दिवशी धीर करून त्यांनी मोठ्या मुलाला फोन लावला. मुलाने पण तुमची खूप आठवण येत आहे आणि त्याच्या मुलाला दाखवण्यासाठी ह्यावर्षी ख्रिस्मसच्या सुट्टीत येतं आहे म्हणून स्वतः सांगितलं आणि बरोबर लहान भावाला पण घेऊन येणार असे सांगितलं. नांनाना आज आनंद गगनात मावत न्हवता, माझी दोन्ही मुलं दोन्ही सुना येणार माझा नातू येणार म्हणत ते चक्क नाचायला लागले, डोळ्यातून आनंदाश्रू येऊन खूप रडले. 

आता तयारीला लगायचं होतं,  मुलांच्या स्वागतासाठी त्यांनी पूर्ण बंगला रंगावायचं ठरवलं तसं खूप वर्ष तेपण राहून गेलं होतं. नातवासाठी हॉल मध्ये मोठा झोपाळा आला, गार्डन मधील पाण्याच्या पॉंडमध्ये नवीन कोई माशे आले, लॉन  कापून चांगले सजवले गेले. मुलांना आवडणारी सर्व मिठाई घरामध्ये आली. अशीच तयारी करता करता ख्रिस्मस आला आणि नांनानी पुऱ्या बंगल्याला रोषणाई केली. 

दोन्ही मुलं त्यांच्या फॅमिली बरोबर येऊन पोचली आणि नानांच घर भरून गेलं, नातवाचे पापें घेताना नाना थकतच न्हवते, त्याच्या बरोबर खेळताना नानांचा पुरा दिवस कसा गेला हे त्यांना पण समजलं नाहीं. जेटलॅग मुळे मुलं आणि सुना लवकर झोपी गेल्या, नातू पण नानाशी खेळता खेळता झोपी गेला त्याला त्याच्या आईजवळ देऊन नाना पण झोपायला गेले, समाधानाची एक लहर पूर्ण अंगातून येऊन गेली आणि नाना गाढ झोपी गेले.

सकाळी मुलं उठली आणि आवाराआवर करणे चालू झाले, ऊन खूप वर आलं तरी नाना उठले न्हवते म्हणून मोठा मुलगा बघायला गेला. नानांच्या रूम मध्ये गेल्यावर नाना अजून बेड वरच होते, जवळ जाऊन बघितल्यावर त्यांचे अंग थंड पडले होते आणि हालचाल बंद पडली होती, ताबडतोब डॉक्टरला बोलावण्यात आले, डॉक्टरने चेक करून नाना रात्रीच अनंतात विलीन झाले म्हणून घोषित केले. नानांचा प्रवास संपला होता पण मरतानाही त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधानाचे तेज होतं, एक कर्मयोगी आपल्या शेवटच्या यात्रेसाठी निघाला होता.

© जितेंद्र मनोहर शिंदे

टिप्पण्या

Polular Posts

सत्तेचा घोडेबाजार

मै खेलेगा

हे सर्व कधी थांबेल का ?

नॉस्टॅल्जिया (Nostalgia)

वेडात मराठे वीर दौडले सात