हे सर्व कधी थांबेल का ?
ब्लॉग चे नाव आहे ''फूड फॉर थॉट '', अनेक वेळा घडणारे प्रसंग, माणसाचे वागणे, येणारी परिस्थिती आपल्याला अंतर्मुख करते आणि मनात विचारांचा गोंधळ उडतो. घडणारे सर्व काही खरच योग्य ते घडत आहे का आणि ह्याच्या पेक्षा पण अजून काही योग्य होऊ शकते का हा विचार मनामध्ये घोळत असतो. आज जग महायुद्धाच्या खाई मध्ये ओढले जात आहे. दीड वर्षापूर्वीचे युद्ध संपत नाही तर आता नवीन युद्ध पेटले आहे. कोकणात वाढून साने गुरुजींची शिकवण अंगी बाणवल्यामुळे मला एकच धर्म माहीत आहे ''खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे '' पण आज धर्माची व्याख्या ज्याची त्याची वेगळीच आहे. जगातील कोणताच धर्म नरसंहार करून आपले वर्चस्व सिद्ध करायला अथवा आपल्या मागण्या पूर्ण करून घ्यायचे समर्थन करत नाही. शेकडो वर्षांपूर्वी आक्रांता दुसऱ्या देशावर चाल करून जाउन तेथे आपले वर्चस्व स्थपित करून लोकांना गुलाम बनवायचे आणि तेच अजूनही चालू आहे.
आजकाल गुलामीचे स्वरूप बदलले आहे, प्रत्येक जण दुसऱ्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत आहेत मग त्याच्या साठी टेकनॉलॉजि ,सोशल मीडियाचा सारासार अनियंत्रित वापर केला जात आहे. खरंच लोकं सुसंस्कृत झाली आहेत का ? शिक्षणाने पदवी मिळू शकते पण सुसंस्कृतपणा संस्कारच आणू शकतात. आजकाल संस्काराची कोणाला काही पडली आहेका ? एखादा ऊच्च विद्याविभूषित माणूस पण मोठ्या आतंकवादी ग्रुप मध्ये असल्याची अनेक उदाहरणे मिळत आहेत. जिथे लहानपणापासून आपल्यावर अन्याय झाला आहे आणि आपल्याला ह्याचा बदला घ्यायचा आहे अशी शिकवण मिळेल तेथे आतंकवादीच पैदा होतील.
शिक्षण पद्धतीला लागलेली बुरशीपण ह्याला जबाबदार आहे. आजचे शिक्षण माणसाला नोकरी मिळवण्यासाठी घडवते, खूप कमी शिक्षण संस्था आहेत ज्या उद्याच्या संस्कारी आणि सुजाण नागरिकाला घडवण्यासाठी धडपडत असतात. महाभारतमध्ये पण युद्ध झाले होते पण ते शांतीच्या सर्व प्रक्रिया व्यर्थ गेल्यानंतर, अधर्माचा नाश करून धर्म संस्थापनासाठी त्या युद्धाचे प्रयोजन होते. आताच्या परिस्थितीमध्ये कोण धर्माच्या आणि कोण अधर्माच्या बाजूने हे काळणेच सोप्पे नाही आहे कारण युद्ध सर्वस्वी आपल्या स्वार्थासाठी आणि आर्थिक महासत्ता होण्यासाठी खेळली जात आहेत, युद्धाचे बोलावते धनी कोणी वेगळेच आहेत आणि त्यामध्ये भरडले कोणी दुसरेच जात आहे.
तरी असॊ, आज इथेच थांबतो आणि तुम्हा सगळ्यांसाठी फूड फॉर थॉट देत आहे कि हे सर्व कधी थांबेल का ?
© जितेंद्र मनोहर शिंदे
Good thoughts!
उत्तर द्याहटवाThanks
हटवाधन्यवाद
हटवाGreat
उत्तर द्याहटवाThanks
हटवा