मेयाझगन

मेयाझगन हा तामिळ सिनेमा बघून महिना झाला पण त्याची गोडी अजूनही मनात तशीच रेंगाळून आहे. हा सिनेमा आजच्या घडीच्या सिनेमा पेक्षा पूर्णपणे वेगळ्या धाटणीचा आहे, आयुष्यात घडलेल्या काही प्रसंगांचा आपल्या मनाच्या पटलावर खोल परिणाम होता, काही गोष्टी कायमच्या रुतून बसतात आणि आयुष्यभर सलत राहतात आणि आतून आपल्याला बदलून टाकतात. काही गोष्टी आपल्या चांगुल पणामुळे आपल्या हातून घडून जातात ज्याला आपण जास्त महत्व देत नाही पण त्याचा दुसऱ्याच्या जीवनावर फार मोठा परिणाम होऊन त्याच आयुष्य बदलून जातात ज्याची आपल्याला किंचित ही कल्पना नसते. काही नाती दूर राहिल्याने तुटल्यासारखी वाटतात पण तिच नाती अचानक समोर येऊन आपल्यावर एवढं प्रेम करतात की जीव गुदमरून जातो आणि आपण खरंच त्या प्रेमाच्या लायकीचे आहोत का हा प्रश्न उभा राहतो. हा सिनेमा म्हणजे नोस्टेलजियाचे एक सुंदर उदाहरणं आहे. आपले लहानपण आठवून त्या आठवणीत रमून जाऊन लहानपणीच्या सवंगड्या बरोबर काही काळ घालवणे किती आल्हाददायक असतें हे ह्या सिनेमात दाखवलं आहे. लहानपणी भावकीच्या भांडणामध्ये अरुण स्वामीला आपले घरं सोडावे लागते जी गोष्ट त्याच्या कायमची जिव्...