वेडात मराठे वीर दौडले सात

 



24 फेब्रुवारी 1674,  जगाच्या इतिहासात अजरामर असा रणसंग्राम घडला होता. स्वराज्याचे सरनौबत प्रतापराव गुजरांच्या नेतृत्वाखाली सहा स्वामीनिष्ठ पराक्रमी मराठे बहलोल खानाच्या बारा हजाराच्या वरच्या सैन्यावर चालून गेले होते. हा इतिहास आहे अजोड स्वामीनिष्ठेचा, अतुलनीय पराक्रमाचा, आपल्या देवासमान राजाच्या शब्दाखातर प्राणाची आहुती देणाऱ्या मर्द मराठ्यांचा.


बहलोलखान ज्या वेळी स्वराज्यावर चालून आला त्यावेळी त्याला कायमचा ठेचून काढण्यासाठी राजांनी प्रतापराव गुजरांना धाडले. प्रतापरावांनी बहलोलखानाचे पाणी तोडण्यासाठी उमराणीच्या जलाशयावर कब्जा करून त्याला कैचीत पकडले. खानाचे सैन्य, त्याचे हत्ती पाण्याबिगर हैराण झाले. त्याच्या एका हत्तीने बेफाम होऊन खानाच्याच सैन्याला पायाखाली चिरडले. अशा आणीबाणीच्या परिस्थितीत खानावर आक्रमण करून प्रतापरावांनी त्याला आपल्या पायाशी लोळवले. खान शरण आला आणि आपल्या जीवाची भीक मागू लागला. शरणागताला मारणे ही माणुसकी नाही असे समजून प्रतापरावांनी खानाला माफी दिली. पण खान सुधरण्यातला न्हवता त्याने पुन्हा स्वराज्यावर हल्ला करून मिरज, कोल्हापूर सारखी शहरे लुटली.

ज्या वेळी शिवाजी महाराजांना सैतान  बहलोलखानाला प्रतापरावांनी माफी दिली असे समजले तेव्हा राजांनी प्रतापरावांना बहलोलखानास ठेचावे या उपर आम्हास तोंड दाखवू नये असे सुनावले.

राजांचा आदेश पूर्ण करण्यासाठी प्रतापराव कासावीस झाले होते, त्यांना जळीस्थळी खान दिसत होता,  कधी एकदा खानाला मारतो आणि राजांना जाऊन भटतो असे प्रतापरावांना झाले होते. रायगडावर राजांच्या राज्याभिषेकाची तयारी चालू होती.


अशातच बातमी आली कि बहलोल खान नेसरीच्या जवळ आपल्या जवळ जवळ बारा हजार सैन्या बरोबर आला आहे. बातमी भेटली तेव्हा प्रतापराव आपल्या सैन्या पासून दूर होते आणि त्यांच्या बरोबर होते त्यांचे फक्त सहा विश्वासू सरदार, पण प्रताप रावांना आपले सैन्य घेऊन चाल करायला उसंत न्हवती, त्यांना समोर दिसत होता बहलोल खान. 

प्रताप रावांनी मागचा पुढचा विचार न करता घोड्याला टाच दिली आणि मग त्यांच्या मागून त्यांचे विश्वासू सरदार पण दौडू लागले आणि चालून गेले बहलोल खानाच्या बारा हजाराच्या सैन्यावर. 

खग सात जळाले अभिमानी वणव्यात, वेडात मराठे वीर दौडले सात.

काय तो पराक्रम, आणि काय ती स्वामीनिष्ठा.  राजांनी स्वराज्य उभे केले ते अश्या निधड्या छातीच्या, वणव्यांमध्ये पण स्वतःला झोकून देणाऱ्या,आपल्या राजासाठी, स्वराज्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या मर्द मराठी मावळ्यांच्या पराक्रमावर. 

धन्य धन्य ते राजे आणि धन्य धन्य ते वीर मावळे.

प्रतापराव गुजर
विसाजी बल्लाळ
दीपोजी राऊतराव
विठोजी शिंदे
विठ्ठल अत्रे
कृष्णाजी भास्कर
सिद्धी हिलाल.

© जितेंद्र मनोहर शिंदे 
 


Comments

Post a Comment

Polular Posts

सत्तेचा घोडेबाजार

मै खेलेगा I

हे सर्व कधी थांबेल का ?

नॉस्टॅल्जिया (Nostalgia)