नॉस्टॅल्जिया (Nostalgia)

                                                                  

नॉस्टॅल्जिया, एक युनिवर्सल फिलींग ज्याच्यामधून कोणीच सुटू शकत नाही. भूतकाळात रमणे सगळ्यांनाच आवडते. भूतकाळातील रम्य आठवणी, तो किंवा तीच्या बरोबरीचे हळवे क्षण, मित्रांबरोबर केलेली दंगामस्ती, लहानपणीची शाळा, शिकवणी, महाबळेश्वर किंवा माऊंट अबूची सहल, एखादी आठवणीतील दिवाळी, मुंबई लोकलचा आणि डबल डेकरचा पहिला प्रवास, पहिला क्रश, सगळ्याच गोष्टी कश्या मनामध्ये उचंबळून येतात आणि मनाला पुन्हा पुन्हा त्या भूतकाळात घेऊन जातात आणि काही वेळेसाठी का होईना आपण तो प्रसंग पुन्हा जगतो, पुन्हा एकदा ती आणि तो हंसो का जोडा बनतात, पुन्हा मित्रांबरोबर शाळा भरते.

नॉस्टेल्जीक बनण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी पण पुरेशा असतात, रोजच्या धकाधकीच्या जीवनात ज्यावेळी आपण थकून जाऊन जरा विसावयाला जातो त्याचवेळी दुरून कुठून तरी जुन्या गाण्याचे बोल कानावर येतात आणि मन भरारी मारते त्या गाण्याच्या काळात, मग हळू हळू उलगडतात त्या गाण्याबरोबर असलेले आपले ऋणानुबंध, सर्वात पहिले त्या गाण्याने मनाला भुरळ पाडली तो क्षण, त्यावेळी बरोबर असणारी ती जवळची व्यक्ती, त्यावेळी घातलेली ती आयुष्यातील पहिली जिन. खरंच हि जुनी गाणी खूप छळतात आणि तितकीच सुखावतात. 90 च्या दशकामध्ये साजन, आशिकीची  गाणी घराघरामध्ये  गाजत होती, ती गाणी आता ऐकली कि परत आपल्याला 90 मध्ये घेऊन जातात. 

असेच असते एखाद्या परफ्युम किंवा फुलाच्या सुगंधाबद्दल, एखादा सुगंध अक्षरशः मनाला वेड लावतॊ आणि काही क्षणात आपल्याला कोसो दूर घेऊन जातो त्या जुन्या प्रसंगात ज्यावेळी आपल्या मनाने त्या सुगंधाची अनुभूती घेतलेली असते. केवडा, मोगरा आणि डेनिमचा परफ्युम असाच नॉस्टॅल्जीक बनवतो. 

काही लोक नॉस्टॅलजियापासून दूर पळू पाहतात, नॉस्टॅल्जिया त्यांना दुखावतॊ आणि हळवा बनवतो. काही लोकांना मागे वळून बघणे म्हणजे वेळेचा अपव्यय केल्यासारखे वाटते, अशी लोकं जास्तच प्रॅक्टिकल असतात.

खरेतर जीवनात पुढे चालताना मागे वळून बघणे तितकेच महत्वाचे आणि जरुरीचे आहे. आपला भूतकाळ हा आपल्याला भविष्यासाठी प्रेरणा देत असतो, भूतकाळात केलेल्या चुका समजून घेतल्याशिवाय भविष्य उज्ज्वल होऊ शकत नाही. प्रत्येकाला भूतकाळ आहे अगदी चौथीपाचवीत शिकणाऱ्या मुलांना पण भूतकाळ असतो आणि तीपण के.जी. किंवा नर्सरीतील आठवणीने नॉस्टॅल्जीक होतात.

राहून राहून एक जुने गाणे आठवते ''भले बुरे जे घडून गेले विसरून जाऊ सारे क्षणभर,जरा विसावू ह्या वळणावर, ह्या वळणावर '' आयुष्यात अनेक वळणे येतील त्यावेळी थोडे विसावून थोडे नॉस्टॅल्जीक होऊया आणि पुन्हा अनुभवुया त्या रम्य भूतकाळाला. देव जर आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत असेल आणि आपल्याला नॉस्टॅल्जीक बनवत असेल तर त्यामागे पण त्याचे काही प्रयोजन असेल, कदाचित ते आपल्यासाठी देवाने दिलेले ब्लेसिंग असेल तर चला आपला आपला नॉस्टॅलजिया एन्जॉय करूया.

© जितेंद्र मनोहर शिंदे 

Comments

  1. Replies
    1. एन्जॉय नॉस्टॅलजिया

      Delete
  2. खुप छान लिहिले आहे.. मनाला भावले

    ReplyDelete

Post a Comment

Polular Posts

सत्तेचा घोडेबाजार

मै खेलेगा I

हे सर्व कधी थांबेल का ?

वेडात मराठे वीर दौडले सात