पापभिरू


डिबीजे कॉलेज मधून बीकॉम झाल्यावर नोकरीच्या शोधात तो मुंबईला पोचला होता, चिपळूणच्या गावातील शाळेत शिक्षण पूर्ण करून मोठ्या उमेदीने गावातून येऊन जाऊन करून त्याने बी कॉम पूर्ण केलं होतं. आई वडिलांनी खूप हाल सोसून त्याला इथपर्यंत शिक्षण दिलं होतं आणि आता बावाने मुंबईला जाऊन चार पैसे मिळवून चांगले दिवस यावं म्हणून म्हातारा म्हातारीनी काळजावर दगड ठेऊन त्याला मुंबईला पाठवलं होतं. 


मुंबईला एका दूरच्या चुलत्याच्या घरात उतरला  आणि नोकरीं शोधण चालू झालं. दोन महिने झाले तरी काय नोकरीं मिळेना, असा किती दिवस चुलत्यावर बोझा बनून राहायचं असं सारखं सारखं त्याला वाटू लागलं आणि उमेद तुटू लागली अशातच नवी मुंबई तील एका कंपनीत कंत्राटी पद्धती नें चालू असलेल्या भरतीत त्याला नोकरीं मिळाली आणि जीव भांड्यात पडला. 

वीस हजार पगार होता पण चुलता डोंबिवलीला आणि नोकरीं नवी मुंबई ला त्यामुळे तिथं राहणं गरजेचं होतं आणि तसें पण आयुष्यभर चुलत्यावर त्याला बोझ बनायचं न्हवत. नोकरीं चालू व्हायच्या आधी घर शोध चालू झाली आणि अश्यातच एका मित्राच्या ओळखीने त्याला आयरोलीच्या एका रूम मध्ये इतर तीन मुलांबरोबर रूम शेअर करायला मिळाली आणि प्रश्न मार्गी लागला. नोकरीं चालू झाली आणि तो नोकरीत पण चांगला रुळला. रूम पार्टनर कंपनीत काम करणारे आणि शिफ्ट मध्ये काम करणारे त्यामुळे ओळख व्हायला वेळ लागली पण हळू हळू जवळीक वाढली. दोन उत्तरे कडील राज्यामधील हिंदी भाषिक तर एक नागपूरकर. त्यांची राहणीमान वेगळं होतं.

असाच एक रविवार आला ज्यावेळी सगळयांना सुट्टी होती आणि सगळ्यांनी एकत्र मिळून बाहेर जाण्याचा बेत केला. आणि संध्याकाळी त्यांच्या बाईक एका बिअर बार समोर थांबल्या. ह्याने आयुष्यात कधी असा नझारा बघितला न्हवता. बार मधील मंद प्रकाशात त्यांनी बिअर आणि इतर अनेक प्रकारच्या मद्याची ऑर्डर दिली, त्याने ह्या सर्व गोष्टींना नकार दिला पण बिअर मुलीपण पितात असं बोलून त्याला बिअर तर प्यावीच लागेल म्हणून पार्टनरनी गळ घातली, आता त्यांच्या बरोबर राहायचं म्हटल्यावर थोडं त्यांच्या कलानं घ्यावं समजून त्याने नाखुशीन हो म्हटलं. तो पहिला घोट उतारायला खूप वेळ लागला,फ्रेश होण्यासाठी तो वॉश रूमला गेला आणि परत आल्यावर पार्टनरनी एवढं तरी संपव म्हणून सांगून पिण्याची गळ घातली, हयावेळी बिअर जास्तच कडू लागली पण त्याने कशी बशी संपवली. काही वेळाने मळमळ होऊन त्याला मोठी उलटी झाली डोकं ठणकु लागलं आणि तसाच काही नं खाता तो रूम वर येऊन झोपला. 

सकाळी अलार्म नें पण जाग नाही आली आणि दुपारी फोन खणखणला तेव्हा झोप उडाली, समोरून आयचा फोनं होता. गावात सिग्नल नसल्यामुळे दोन एक दिवसांनी बस स्टॉप वरच्या ठेम्ब्यावर जाऊन आई बाबा फोन करायचे.फोन उचलून पहिल्या शब्दालाच आईच्या काळजात चरर झालं आणि बावा ठीक आहेस ना म्हणून विचारणा झाली, ह्यच्या तोंडातून शब्द निघेना, काय नाय आय थोडी कणकण होती म्हणून सुट्टी घेऊन झोपलो होतो म्हणून त्याने विषय मारला, समोरून बावा एकदा बघावंसं वाटतंय येशील का दोन दिवस म्हणून आयची मागणी, आय झोपतो आता म्हणून त्याने फोन ठेवला, कंठ भरून आला होता आणि शेवटी बांध फुटला आणि पुढची काही वेळ तो ढसा ढसा रडला, काय झालं होतं काय चुकलं होतं त्याचं त्यालाच समजत न्हवतं पण काहीतरी आक्रित घडलं होतं आणि कशातच मन लागत न्हवतं.

रात्री उशिरा पर्यंत झोप नाही लागली, सकाळी उठून कामावर गेला पण तिथेही मन लागेना. लंच टाइम ला साहेबाच्या केबिन मध्ये जाऊन गावाला जायचं आहे दोन दिवस सुट्टी पाहिजे बोलला, साहेबानं त्याच्या अवतारा कडे बघून लगेच हो म्हटलं आणि रात्रीची चिपळूण बस पकडून सकाळी चिपळूणला पोचला आणि पहिली गावची बस पकडून गावाकडे निघाला.


गाडी रामवरदायीनी मंदिराच्या थांव्यावर थांबली आणि हा आपसूकच खाली उतरला, पारोसा देवळात जायला बरं वाटतं न्हवत पण उतरलोय तर जावे म्हणून देवळात पोचला, गाभाऱ्यापासून थोडा दूरवर उभा राहूनच नमस्कार केला, देवीला नजर मिळवायला पण त्याला कससेच वाटतं होतं, गुरुवाने आरज घातला आणि ह्यानं फक्त डोकं टेकवलं आणि पुढं घरासाठी निघाला. गाव अजून पाच किलोमीटर होता आणि हा चालतंच निघाला. म्रीगाच नक्षत्र निघालं होतं आणि नांगरणी चालू झाली होती, सगळी कडे कसे हिरवे गार झाले होते, त्याच्या मनामध्ये पण पालवी फुटली आणि मन ताजेतवानें झाले, हे सर्व सोडून आपण कुठे जाऊन पडलो असा एक विचार मनात येऊन गेला. 

घरी पोचला आयला भेटला आणि गळ्यात पडला थोडा वेळ काही बोलणं नाहीं झालं. आयन अंघोळी साठी चुली वर पाणी ठेवलं, त्या कडत कडत पाण्यानें अंघोळ करून त्याला नवा हुरूप आला. घरच्या देवाच्या पाया पडला आणि महादेवाच्या मंदिरात गेला. देवळाचे बांधकाम चालू होतं आणि आपण पण लवकरच ह्या देवळासाठी चांगली देणगी देऊ असा एक निश्चय करून तो पुढे खोऱ्यात भैरीच्या देवळात पोचला, ह्या वर्षाची राखण द्यायची राहिली होती त्यानं देवाच्या नावानं कोंबडं सोडून देवाला सांभाळ म्हणून साकडं घातलं. गावातील म्हाताऱ्या कोताऱ्यांना भेटून आशीर्वाद घेत दुसरा दिवस पण संपत आला. 

रात्रीच्या गाडीनं मुंबईला निघाला. आयनं आणि बापानं पाप्या घेऊन पोराला संध्याकाळच्या बस मध्ये बसवलं, बस पकडून हा मुंबईला निघाला, बसनें परशुराम घाट सोडला आणि हळू हळू हा झोपेच्या आधीन झाला, खडकडं करणाऱ्या बस मध्ये पण त्याला निवांत झोप लागली आणि बस पुढं मुंबईला निघाली.

© जितेंद्र मनोहर शिंदे.

Comments

Polular Posts

सत्तेचा घोडेबाजार

मै खेलेगा I

हे सर्व कधी थांबेल का ?

नॉस्टॅल्जिया (Nostalgia)

वेडात मराठे वीर दौडले सात