वेडात मराठे वीर दौडले सात

24 फेब्रुवारी 1674, जगाच्या इतिहासात अजरामर असा रणसंग्राम घडला होता. स्वराज्याचे सरनौबत प्रतापराव गुजरांच्या नेतृत्वाखाली सहा स्वामीनिष्ठ पराक्रमी मराठे बहलोल खानाच्या बारा हजाराच्या वरच्या सैन्यावर चालून गेले होते. हा इतिहास आहे अजोड स्वामीनिष्ठेचा, अतुलनीय पराक्रमाचा, आपल्या देवासमान राजाच्या शब्दाखातर प्राणाची आहुती देणाऱ्या मर्द मराठ्यांचा. बहलोलखान ज्या वेळी स्वराज्यावर चालून आला त्यावेळी त्याला कायमचा ठेचून काढण्यासाठी राजांनी प्रतापराव गुजरांना धाडले. प्रतापरावांनी बहलोलखानाचे पाणी तोडण्यासाठी उमराणीच्या जलाशयावर कब्जा करून त्याला कैचीत पकडले. खानाचे सैन्य, त्याचे हत्ती पाण्याबिगर हैराण झाले. त्याच्या एका हत्तीने बेफाम होऊन खानाच्याच सैन्याला पायाखाली चिरडले. अशा आणीबाणीच्या परिस्थितीत खानावर आक्रमण करून प्रतापरावांनी त्याला आपल्या पायाशी लोळवले. खान शरण आला आणि आपल्या जीवाची भीक मागू लागला. शरणागताला मारणे ही माणुसकी नाही असे समजून प्रतापरावांनी खानाला माफी दिली. पण खान सुधरण्यातला न्हवता त्याने पुन्हा स्वराज्यावर हल्ला करून मिरज, कोल्हापूर सारखी शहरे लुटली. ज्या वे...