मनाचिये गुंती


खूप दिवसापूर्वी एक कहाणी वाचली होती , एक माणूस आपल्या मुलांना घेऊन बागेत जातो तिथे त्याची मुले खूप दंगा मस्ती करत असतात ज्यामुळे अनेक लोकांना त्रास होतो पण त्या माणसाचे त्याच्याकडे लक्षच नसते आणि तो आपल्या तंद्रीत असतो.  सगळे जण रागावून त्याच्याकडे कंप्लेंट करायला येतात आणि त्याच्यावर खूप ओरडू लागतात मग तो भानावर येऊन काय झाले हे विचारतो तेव्हा सगळे जण त्याला त्याच्या मुलांनी दिलेल्या त्रासाबद्दल सांगतात , तो माणूस सगळ्यांची माफी मागतो आणि सांगतो कि ह्यांची आई आज सकाळीच देवाघरी गेली आणि त्यांना खेळण्यासाठी मी इथे घेऊन आलो आहे. ह्या प्रसंगांमधून दिसून येते कि बाहेरून आपण कधीही माणसाची पारख करू शकत नाही , तो माणूस बागेत आला होता पण त्याच्या मागची कहाणी काही औरच होती. असाच प्रत्येक जण आपल्या जीवनामध्ये कुठेतरी उलझलेला असतो , तो जसा दिसतो तसा खरंच असेल ह्याची खात्री नसते , प्रत्येक जण आपल्या  मानसिक द्वंदा मध्ये गुरफटलेला असतो आणि आपली एक लढाई लढत असतो ज्या मध्ये अर्जुन पण तोच असतो आणि कृष्ण पण तोच असतो , हि लढाई कोणालाच माहीत नसते पण ती सतत चालू असते , हा संघर्षच माणसाला एका उंचीवर आणून सोडतो आणि मानसिक प्रगल्भता आणतो. प्रत्येकाची लढाई वेगळी असते. 

स्टुडन्ट लाइफ मधील द्वंद्वव वेगळे असते , शिक्षणा बरोबर शाळेतील अनेक इतर विषय पण मनामध्ये कोंडून असतात , काही दुसऱ्यांना शेअर करता येतात तर काही स्वतःच सोडवावे लागतात. तिने किंवा त्याने दिलेली वागणूक , शिक्षकांनी केलेला अपमान , इतरांबरोबर झालेली तुलना आणि त्यामुळे आलेले नैराश्य , अनेक गोष्टी मुलांच्या मनाच्या पटलावर कोरल्या जात असतात आणि त्या सर्वांमधून बाहेर पाडण्यासाठी ते आपली लढाई लडत असतात , खूप कमी मुलांचे पालक हे समजून घेऊ शकतात आणि मुलांना मित्रासारखे वागवून त्यांना ह्या मधून बाहेर पडायला मदत करतात. अश्या अनेक लढाया लढत काही मुलांचा मानसिक विकास खुंटतो , ती अबोल होतात , विश्वास गमावून बसून सगळ्याच ठिकाणी हळू हळू मागे पडतात, अश्या मुलांना योग्य साथीची , मार्गदर्शनाची गरज असते जे त्यांच्या पालकांकडून आणि शिक्षकांकडून त्यांना योग्य वेळी मिळाले तर त्यांच्या आयुष्याचे सोने होऊ शकते.

जशी हालत मुलांची तशीच प्रौढांची, त्यांच्या समस्या वेगळ्याच असतात. ऑफिस मधील समस्या वेगळ्या आणि घरातल्या वेगळ्या. प्रोफेशनल आणि पर्सनल अश्या दोन्ही खिंड तिला किंवा त्याला लढवायच्या असतात. प्रोफेशनल लाईफ मध्ये अनेकदा अपमान, लाचारी सहन करून दिवस काढायला लागतात त्याच वेळी घरामध्ये हसमुख राहून संसाराचा गाडा रेटावा लागतो.  मुलांना वेळ देणे , परिवाराला वेळ देणे रोजच्या धकाधकीत जमवावे लागते. त्यांच्या शांत स्वभावात पण एक दडलेला ज्वलामुखी असतो जो कधी फुटेल ह्याची खात्री नसते आणि तो फुटू नये म्हणून काही माणसे व्यसनांच्या आहारी जाऊन आपल्या जीवनात विरंगुळा शोधू पाहतात. चांगली संगत लागली तर सत्संगाचा मार्ग पकडून जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडू शकतो आणि जर कुसंगती लागली तर काय दुर्दशा होते त्याची त्यांना सुरवातीला कल्पना नसते. 

जगामध्ये सगळीच माणसे अशी आपापली लढाई लढत असतात , वरून वरून सुखी दिसणारा माणूस आत खोलवर दुख्खी असू शकतो , प्रेत्येकाच्या मनातील द्वंद्व आपण समजू शकत नाही पण आपण त्याच्या बद्दल कोणताही समज गैरसमज करण्यापूर्वी एकदा त्याच्या सद्य स्थितीची योग्य माहिती घेऊन त्याच्या भावना नीट समजून घेतल्या तर कदाचित भावनिक पातळीवर त्याला फार मोठा आधार देऊ शकू आणि त्याला त्याच्या भावविश्वातून बाहेर पडण्यासाठी मदत करू शकू. इंग्रजी सहा आकडा एका बाजूने सहा तर दुसऱ्या बाजूने नऊ दिसतो , आता तो जर दुसऱ्याला नऊ दिसत असेल तर आपण समजून घ्यायला पाहिजे कि तो दुसऱ्या बाजूने बघतो आहे म्हणून त्याला तो नऊ दिसतो आहे आणि त्याच्या मध्ये त्याची काहीच चूक नाही आणि त्याला समजून घेण्यासाठी कदाचित वेळ पडल्यास आपण आपली जागा सोडून त्याच्या अंगाने बघायला पाहिजे, असा समंजस पणा जर सगळ्यांनी अंगिकारला तर जीवन खूप  सुखमय होऊन जाईल.

© जितेंद्र मनोहर शिंदे 

Comments

Post a Comment

Polular Posts

सत्तेचा घोडेबाजार

मै खेलेगा I

हे सर्व कधी थांबेल का ?

नॉस्टॅल्जिया (Nostalgia)

वेडात मराठे वीर दौडले सात