बकेट लिस्ट २०२४
नवीन वर्षाचे स्वागत आपण सर्वांनी जोरात केले आणि आता हळू हळू २०२४ ची तारीख लिहिणे आपल्या हातवळणी पण होऊ लागले आहे. नवीन वर्ष, नवीन आशा, अनेक इच्छा आकांक्षा. नेहमी प्रमाणे पहिले काही दिवस नवीन वर्षासाठी केलेल्या संकल्पा नुसार अनेकांनी दिनक्रम चालू पण केला असेल. कदाचित योगा, ध्यान, चालणे, धावणे, वाचणे, लिहिणे आणि बरेच काही चालू केले असेल, काहींचा दिनक्रम अजूनही चालू असेल तर काहींनी बासनात गुंडाळून त्याला राम राम ठोकला असेल. संकल्प करणे चांगलेच आणि त्यांना पूर्णत्वाला नेणं अजूनही चांगले पण ह्या संकल्पा बरोबर एक दुसरी गोष्ट करू शकतो ज्याला म्हणतात बकेट लिस्ट.
राहून गेलेले काहीतरी ज्याची इच्छा आपण लहानपणी, तरुणपणी किंवा एखाद्या नाजूक प्रसंगी केलेली असतें, ती इच्छा किंवा तिच्या सारख्या अनेक इच्छा मनात खोल वर रुजून बसलेल्या असतात आणि त्यांना थोडीशी हवा दिली की कश्या खुलून वर उंचबळू लागतात, त्या सर्व इच्छांना जिवंत करून त्यांची लिस्ट बनवणे म्हणजेच बकेटलीस्ट. हि लिस्ट काहीही असू शकते, हिवाळ्यात कडक्याच्या थंडीत रात्री आईसक्रिम खाणे किंवा नदीकिनारच्या वाळूत मस्त लोळणे. अनेक छोट्या छोट्या गोष्टी मनात आलेल्या असतात पण करायच्या राहून जातात डेली रुटीन मध्ये अडकल्या मुळे किंवा वेगळा स्वतःसाठी वेळ न काढल्यामुळे. ह्या वर्षी आधी ती लिस्ट बनवूया आणि काढूया वेळ ती पूर्ण करण्यासाठी. माधुरीच्या बकेट लिस्ट सिनेमा मध्ये ती आपल्या हार्ट डोनर च्या बकेट लिस्ट पूर्ण करण्यासाठी झटते आणि स्वतः एक नवीन आनंदाची अनुभूती घेते, तीच अनुभूती आपण पण घेऊया.
काय धम्माल येईल ना हे सर्व करायला. थोडं लहान व्हावे लागले तरी चालेल, कोणाचा ओरडा खायला लागला तरी चालेल, घरच्यांनी विचित्र पणे बघितले आणि स्क्रू ढिला तर नाहीना असे विचारले तरी चालेल पण चला ती छोटीशी गोष्ट करूया आणि क्षणासाठी का होईना त्या आनंदाची अनुभूती घेऊया. बकेट लिस्ट पूर्ण करताना फक्त आनंद च मिळेल असे नाही काही काही बकेट लिस्ट आपल्याला एक नवीन ऊर्जा, नवी उमेद, आपला नवा साक्षात्कार घडवतील. बकेट लिस्ट फक्त स्वतःसाठी सीमित न ठेवता ज्यावेळी आपण समाजाचे देणे लागतो म्हणून काही गोष्टी करू त्याने थोरामोठ्यांचे आशीर्वाद देखील निश्चितच मिळतील.
आत्ता हि बकेट लिस्ट नेमकी काय असावी किंवा असू शकते ह्यावर विचार केला तर जास्त विचार करायची गरजच नाही फक्त शांतपणे बसून काय काय करायचे राहून गेले ते उमगून घ्यावे मग् लिस्ट आपोआप बनत जाईल. मग् आठवेल लहानपणी शाळेत अभ्यास खूप केला पण दंगामस्ती करायची राहूनच गेली , तसा आपला पिंड न्हवता असे न्हवे पण शिस्तीच्या बगड्यामध्ये राहूनच गेले. तर आताही वेळ गेलेली नाही, हा शाळा नाही मिळणार पण जीवनाची शाळा अजून चालू आहे तर घ्या थोडा दंगा करून आपल्या मित्रांबरोबर किंवा आपल्या मुलांबरोबर. आपली बकेट लिस्ट क्रेझी असू शकते किंवा अगदी साधी असू शकते पण ती पूर्ण केल्यावर मिळणारी अनुभूती निश्चितच सुंदर असेल.
आता बकेट लिस्ट आणि संकल्प ह्या मध्ये फरक काय तर तसा थोडा आहे किंवा काहीच नाही, दोन्ही तशे सारखेच. संकल्प हा काहीतरी नवं सातत्याने करून काहीतरी उच्च साध्य करायचा असू शकतो पण बकेट लिस्ट एखादी साधीशी बाब करून त्याची मज्जा चाखायची असू शकते. जर वजन घटवणे तुमचा संकल्प असेल आणि नृत्य शिकणे तुमची बकेट लिस्ट असेल तर नृत्य शिकले कि वजन आपोआपच कमी होईल मग झाल्यान दोन्ही सारख्याच. मी माझी बकेट लिस्ट बनवत आहे बघू किती पूर्ण करू शकतो ते, तुमची पण बनवा आणि जरूर कळवा.
© जितेंद्र मनोहर शिंदे
👍
ReplyDeleteKhup chhan
ReplyDeleteमस्त जीतू
ReplyDeleteThank You
ReplyDelete