मेयाझगन
मेयाझगन हा तामिळ सिनेमा बघून महिना झाला पण त्याची गोडी अजूनही मनात तशीच रेंगाळून आहे. हा सिनेमा आजच्या घडीच्या सिनेमा पेक्षा पूर्णपणे वेगळ्या धाटणीचा आहे, आयुष्यात घडलेल्या काही प्रसंगांचा आपल्या मनाच्या पटलावर खोल परिणाम होता, काही गोष्टी कायमच्या रुतून बसतात आणि आयुष्यभर सलत राहतात आणि आतून आपल्याला बदलून टाकतात. काही गोष्टी आपल्या चांगुल पणामुळे आपल्या हातून घडून जातात ज्याला आपण जास्त महत्व देत नाही पण त्याचा दुसऱ्याच्या जीवनावर फार मोठा परिणाम होऊन त्याच आयुष्य बदलून जातात ज्याची आपल्याला किंचित ही कल्पना नसते. काही नाती दूर राहिल्याने तुटल्यासारखी वाटतात पण तिच नाती अचानक समोर येऊन आपल्यावर एवढं प्रेम करतात की जीव गुदमरून जातो आणि आपण खरंच त्या प्रेमाच्या लायकीचे आहोत का हा प्रश्न उभा राहतो.
हा सिनेमा म्हणजे नोस्टेलजियाचे एक सुंदर उदाहरणं आहे. आपले लहानपण आठवून त्या आठवणीत रमून जाऊन लहानपणीच्या सवंगड्या बरोबर काही काळ घालवणे किती आल्हाददायक असतें हे ह्या सिनेमात दाखवलं आहे. लहानपणी भावकीच्या भांडणामध्ये अरुण स्वामीला आपले घरं सोडावे लागते जी गोष्ट त्याच्या कायमची जिव्हारी लागते, घरं सोडताना त्याची सायकल तो सोडून देतो ताकी कोणी गरजू ती वापरू शकेल आणि तिच सायकल त्याच्या एका दूरच्या नातेवाईकाच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आणते. त्या नातेवाईकाचा मुलगा त्या सायकल ला आपल्या भाग्योदयाचे कारण असल्याने जीवापाड जपतो आणि जेव्हा बऱ्याच वर्षाने अरुण स्वामी त्याला त्याच्या बहिणीच्या लग्नात भेटतो त्यावेळी अक्षरशः त्याच्या गळ्यात पडतो, त्याची उठ बस करतो त्याची सावली बनून त्याला भरभरून जीव लावतो पण गंम्मत अशी असते की अरुण त्याला ओळखतच नाही पण त्याचे मन दुखावले जाऊ नये आणि काही तासांची तर गोष्ट आहे असे समजून ते त्याला जाणवून देत नाहीं. पण अरुण ला त्याच्या बरोबर एक रात्र घालवावी लागते आणि नंतर येणारा प्रत्येक प्रसंग आपणाला गुंतवून टाकतो , हे निष्पाप प्रेम करणारे आणि निर्मळ मनाचे केरेक्टर कार्तिने जीव लावून साकारलं आहे, त्याचा बिअर पिताना थोडी चढल्यावर भैया तुमने मुझे अबतक नामसे नही बुलाया हा प्रश्न काळजाला चिरून जातो.
अरुण कार्ती च्या प्रेमाला आपण लायक नाही कारण आपण तर त्याला ओळखतच नाही हे जाणून त्याला न सांगताच निघून जातो आणि मग कुढत बसतो. त्याचं कुढण त्याची बायको आणि मुलगी समजते आणि त्याला कार्तिचा फोन लावून देऊन मोकळा व्हायला लावतात, अरुण चे मोकळं होणं पण खूप सुंदर दर्शवले आहे जे नात्यातील सुंदरता पारदर्शी पणा मुळे कशी वाढीला येते ते दाखवून जाते.
ह्या सिनेमाचे सर्वात मोठं आकर्षण म्हणजे ह्यातील स्त्री पात्र, प्रत्येक स्त्री पात्र म्हणजे वत्सल्याचा झराच. अरुणची जुनी मैत्रीण जीला त्याच्या बरोबर लग्न करता येत नाही ती काही क्षणासाठी त्याला भेटते, दोघांच्या बोलण्यात निव्वळ प्रेम आणि दुसऱ्या बद्दल काळजी दिसते, कोणताही वाईट विचार नाही, ती त्याला जाता जाता अलगद स्पर्श करून जाते ज्याच्या मध्ये तीच अव्यक्त प्रेम आणि फक्त प्रेमच दिसतं.
दुसरं पात्र अरुणची बहीण जी अरुण ला घेऊन आलेले गिफ्ट चे दागिने भऱ्या रिसेप्शन मध्ये घालायला लावते आणि मेरा भाई आया है म्हणत लहान मुलीसारखी रडते, अरुण पण जमिनीवर बसत तिचा पाय आपल्या हातात घेत तिला रडत रडत पैंजण घालतो, हा प्रसंग अक्षरशः डोळ्यात पाणी आणतो.
कार्ती ला समजून घेणारी आणि अरुण ला सारखे सारखे भैया कुछ चाहिये तो मुझे बोलना म्हणून काळजी घेणारी कार्तिची पत्नी. अरुण घरी जाण्यासाठी भल्या पहाटे बस स्टॉप वर जातो तिथे फुलं विकणारी बाई त्याची अवस्था बघून त्याला बसायला देते आणि त्याला न विचारताच देवाचा अंगारा त्याच्या कपाळी लावते, अरे कोण कुठली बाई ती पण अशी काळजी घेऊ शकते. अरुण ला लग्नाला जायचे नसते त्याला गावाला जायला भाग पडणारी आणि आयुष्यात त्याची प्रत्येक गोष्ट समजून घेणारी सहचरणी. आपले पप्पा कुठंत बसले आहेत हे जाणून त्याला न विचारताच कार्तिचा नंबर डायल करून त्याच्याशी बोलायला लावून मोकळं व्हायला लावणारी अरुण ची मुलगी. सगळी पात्र कायमची मनात घरं बनवतात.
मेयाझगान म्हणजे तामिळ मध्ये सच्च्या मनाचा देखणा पुरुष, अरुण आणि कार्ती खरंच सच्च्या मनाचे देखणे पुरुष आहेत आणि त्यांच्या आयुष्यात आलेल्या सर्व स्त्रियांही तितक्याच सच्या आणि सुंदर मनाच्या आहेत. हा सिनेमाचं माणुसकीच्या नात्याची किंमत समजणाऱ्या आणि त्याला निभावणाऱ्या सुंदर माणसांनी भरलेला आहे, अशी माणसं आजकाल विरळी होत आहेत ज्यांना जपणे तितकेच जरुरी आहे.
© जितेंद्र मनोहर शिंदे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा