युतीचा धर्म
युतीचा धर्म सगळ्यांनी पाळला, कमळाने धनुष्या बरोबर घड्याळाला पण साथ दिली आणि मशाल तुतारीने हाताबरोबर मिळवणी केली. सगळं कसं लिहून दिल्यासारखं घडवण्याचा प्रयत्न झाला आणि आम्ही सर्व एक आहोत म्हणून नेते मंडळींनी जनतेसमोर आणाभाका घेतल्या.
प्रचाराच्या फडामध्ये सगळं कसं वरवर ठीक होतं आतलं राजकारण मात्र वेगळंच चाललं होतं, आतल्याआत मशाल हाताला भारी पडत होती आणि तुतारी वाजवायला हात पुढे होतं न्हवता. कमळाच आणि धनुष्यच गणित तसं दिसायला चांगलच जुळलं होतं पण घड्याळ कधी कधी चुकीची वेळ दाखवत होतं.
युतीत सगळ्यांचं बरळण चालू होतं कारण ज्याला त्याला आपलाच एक्का चालवायचा होता, कोण मोठा कोण लहान ह्या संभ्रमात सगळेच होते कारण प्रत्येकाचा इतिहास फार मोठा कर्तृत्ववान होता. सगळे जण अजूनही त्या आपल्या इतिहासात रममाण होते आणि वस्तुस्थिती पासून थोडे दूरच होते. रेल्वेचे इंजिन आणि वंचित पण मोठ्या आत्मविश्वासाने भरून गेले होते.
प्रचाराच्या रणधुमाळीत सामान्य कार्यकर्ता संभ्रमातच राहिला कधी काळी ज्या हाताला शिव्या दिल्या आणि ज्याच्या बरोबर रस्त्यावर उतरून लढाया लढून चार गुन्हे आपल्यावर घेतले त्या हाताला आज साथ द्यायची वेळ आली होती. ओरिजिनल धनुष्य कोणाच्या हातात आहे आणि मशाल पकडणारा किती सच्चा आहे ह्या गोष्टीच कोडं काय सुटत न्हवतं पण प्रचारात तर धनुष्य आणि मशाल आपणच ओरिजिनल आणि दुसरा ड्युप्लिकेट चा नारा लावत होते. घड्याळा बाबतीत पण तेच होते आपली निष्ठा कोणत्या नेत्या समोर ठेवावी हा प्रश्न काय सुटत न्हवता, एक धुरंधर जाणता राजा तर दुसरा सगळ्यांचा लाडका दादा.
तरीपण युतीचा धर्म सगळ्यांनी पाळला आणि आपापल्या युतीला भरघोस प्रतिसाद देऊन निवडणुकीचा शिरस्ता पूर्ण केला. ज्याची युती आणि युक्ती मजबूत होती त्यांनी अटके पार झेंडा रोवला पण आता पुढे ती किती टिकून राहील हा मोठा प्रश्न उभा राहिला, आता कोण शिलेदार होणार हा यक्ष प्रश्न आहे आणि युतीचा धर्म पण निभावयाचा आहे.
✍️ जितेंद्र मनोहर शिंदे. 01डिसेंबर 2024.
Comments
Post a Comment