शिमगा



आज गण्या खूप खुश होता कारण त्याची शिमग्याची सुट्टी मंजूर झाली होती आणि तो शिमग्याला कोकणात आपल्या गावाला जाणार होता. अजून काही दिवस होते  पण जायची तयारी पण करायची होती. आईबाबांना नवीन कापडं, लहान भावाला नवीन मोबाईल द्यायचा होता. आयुष्य तसं तंगीतच जात होतं, भांडुपच्या चाळीतील एका खोलीत चार जण मिळून  राहत होते आणि हा कंत्राटी पद्धतीने एका ऑफिस मध्ये नोकरी करत होता. महिना पंचविस हजार पगारात जीवन कंठत होता त्यामध्ये पण जमवून महिना दोन महिन्याला दहा पंधरा हजार गावाला घरी पाठवत होता आणि बाकी सर्व मुंबईत कुठं उडून जात होते त्याचा पत्ताच लागत न्हवता.

तरी त्याला सुपारीच्या खंडाची पण लत न्हवती. मित्रांबरोबर बाहेर जाऊन पैसे उडवणे त्याला कधी जमलेच नाही कारण तेव्हढे पैसे त्याच्या गाठीला जमतंच न्हवते. काही हौस मौज करताना पण अनेक वेळा विचार करावा लागत होता. लहान भाऊ कॉलेजात शिकत होता आणि त्याने अनेक महिने मोबाईल पाहिजे म्हणून तगादा लावला होता. ह्या शिमग्याला येताना आणतो म्हणून त्याने शब्द दिला होता. ऑनलाईन मागवला तर स्वस्त मिळेल म्हणून मित्रा कडून ऍमेझॉन चे अकाउंट काढून घेऊन त्याच्यामध्ये पण इएमआय ऑप्शन चेक करून त्याने एक पंधरा हजाराचा मोबाईल घेतला. तसा त्याचा पण खूप जुना झाला होता पण स्वतःचा मोबाईल अजून काही वर्ष चालवू म्हणून त्याने नवीन घेणे असंच पुढं टाकलं होते आणि भावासाठी नवीन घेतला होता. 

कोकणात गावाला जायचं म्हणजे ट्रेन हाच स्वस्त पर्याय होता, जनरल च्या डब्ब्यात स्वतःला कोंबून जिथे मिळेल तिथे बसून तो शिमग्याला गावाला पोचला. आई बाबांना नवीन कापडं आणि भावाला नवीन मोबाईल देऊन त्यांच्या चेहऱ्यावर आलेली चमक बघून गाण्याचा आत्मा तृप्त झाला आणि तो गावात फिरायला बाहेर निघाला.

गांवात घराघरात चाकरमान्यांची चहल पहल होती, सारा गाव कसा चैतन्याने फुलून गेला होता. आज रात्री घरात पालखी येणारं होती. वर्षातील तो सर्वात मोठा दिवस ज्या दिवशी देव पालखीत बसून सर्व ग्रामस्थांच्या घरात येतात आणि त्यांची सेवा करून सर्व ग्रामस्थ भक्तीभावाने फुलून जातात. कोकणातील ही प्रथाच प्रत्येक चाकर मन्याला गावाकडे ओढते.

रात्री पालखी घरी आली आणि ह्याने डोळे भरून दर्शन घेतलं आणि देवाला साकडं घातलं, गुरुवाने देवापुढे आरज घातला "पोरा टोरा जिथं पण असतील त्यांना सुखी ठेव आणि त्यांची रक्षा कार".आरज झल्यावर गाण्याला नवीन ऊर्जा मिळाली कारण त्याला आता खात्री होती की आता पूर्ण वर्षासाठी आपणास आपल्या देवाचा आशीर्वाद मिळाला आहे. रात्री पालखी नाचवण्यात आणि ढोल बडवण्यात गण्या अगदी तल्लीन झाला होता, पूर्ण रात्र जागरणात कशी संपली ते कळलेच नाही, पहाटे पहाटे थोडा डोळा लागला आणि गण्या झोपी गेला. सकाळी उठल्या नंतर मनात मरगळ होती कारण आज रात्री निघायचं होतं, सुट्टी संपली होती, मन खट्टू झालं होतं.



जेवण झाल्यावर फिरण्यासाठी महादेवाच्या मंदिराकडे निघाला, मंदिराच्या प्रांगणात गावचा होम अजून धगधगत होता. तो खूप वेळ त्या होमाकडे बघत राहिला,मनात अनेक विचारांची झुंबड उडाली होती, मी कोण आहे, माझं अस्तित्व काय, मी काय करतोय त्या मुंबईत, मुबंईत आणि ह्या गावात किती फरक आहे, खरंच परत मुंबईला जायची गरज आहे का ?, त्या पंचवीस हजारासाठी एवढी धावपळ करण्यापेक्षा त्या पगारापेक्षा थोडं कमी मिळालं तरी हिथेच कुठं कामं बघूयाका ?, मिळेल का इथे काही काम का करूया शेती आणि राहुन जाऊया इथेच गावांत आपल्या आई बाबांबरोबर ? विचारांची होळी जोरातच पेटली होती आणि आता तो गावातच राहायच्या विचारावर ठाम होतं चालला होता त्याने ठरवलं होतं आता घरी जायचं आणि आई बाबांना सांगायचं की मी नाही जात मुंबईला, इथेच कुठं तरी तालुक्याच्या ठिकाणी नोकरी बघतो किंवा शेती मध्ये हात भार लावतो. मनात विचार पक्का केला आणि त्याने महादेवाला दंडवत घातला.

घरात येऊन पोचला तर म्हातारा कौलावर चढून कौल ठीक करत होता, अनेक कौलं तुटली होती ज्यामुळे पावसाळ्यात घरात पूर्ण पाणी येतं होतं, पावसाळ्यात प्लास्टिक लावून छत झाकून घ्यायला लागत होतं. घराच्या एका भिंतिची तर पूर्ण पडझड झाली होती आणि सल्द लावून कसबसं तिला उभी केली होती. म्हाताऱ्याची नवीन घरं बांधायची अनेक वर्षाची इच्छा अधुरीच राहिली होती आणि आता त्याची घराची निदान डागडुजी करून घेण्याची इच्छा होती. गाण्याला जवळ घेऊन म्हातारा बोलला गण्या येत्या पावसाळ्या आधी आपल्याला घराला नवीन कौल टाकायला लागतील आणि एक चिऱ्याची भिंत पण बांधायला लागेल नाहीतर सर्व पाणी घरात येईल, तशे अजून दोन तीन महिने आहेत पण जरा जास्त पैसे पाठवायचं बघ जरा. 

गण्या म्हाताऱ्याकडं बघत आणि आपल्या वडिलोपार्जित पडक्या घराकडं बघत कधी हा बोलला ते त्याचे त्यालाच नाही समजलं, म्हातार्याच्या चेहऱ्यावर हुरूप आला आणि आईनं आपल्या शाहाण्या पोराकडं बघत बोटं मोडत त्याची नजर काढली.

संध्याकाळची गाडी पकडून गण्या मुंबईला निघाला, मनातील विचारांची होळी आता थंडावली होती आणि हा शिमगा त्याला आपल्या म्हाताऱ्यासाठी नवीन घर बांधून द्यायची ऊर्जा देऊन गेला होता, आता नवीन जास्त पगाराची नोकरी शोधायची, लागल्यास जास्त ओव्हर टाइम पण करायचा पण म्हाताऱ्याची इच्छा पूर्ण करायची असा प्रण त्याने केला. गाडी कशेडीच्या घाटातील अनेक बोगदे पार करत शिटी वाजवत दौडत होती आणि गण्या जनरलच्या डब्ब्यात एका कोपऱ्यात पाय दुमडून बसून मस्त झोपेच्या आधीन गेला होता.

© जितेंद्र मनोहर शिंदे

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

Polular Posts

सत्तेचा घोडेबाजार

मै खेलेगा

वेडात मराठे वीर दौडले सात

हे सर्व कधी थांबेल का ?

नॉस्टॅल्जिया (Nostalgia)