'' साडेसाती''


जन्माला आला त्यावेळीच वजन थोडं कमी होतं पुढे जसा जसा मोठा होतं चालला तसा शरीरामध्ये प्रतिकार शक्तीची कमी असल्यामुळे वारंवार आजारी पडणं चालूच होतं, सर्दी खोकला जसा पाचवीलाच पूजला होता. अभ्यासात पण गती कमीच होती आणि कसा बसा वरच्या इयत्ता पार करत तो दहावी पर्यंत पोचला होता, दहावी त्याला जरा जास्तच कठीण जात होती. घरच्यांना त्याची खूप काळजी वाटायला लागली आणि ह्याचे भविष्यात काय होणार म्हणून त्याला एका ज्योतिष्याकडे दाखवण्यात आले. ज्योतिष्याने कुंडली मध्ये साडेसाती आहे म्हणून सांगितलं, त्यावेळी तो तसा लहान होता पण काहीतरी वाईट आहे आणि पुढं वाईटच होणार हे त्याला कुठे तरी समजलं आणि त्याची उरली सुरली हिम्मत पण तिथेच संपू लागली. तसा तो घरच्या वातावरणानुसार धार्मिक बनला होता पण आता त्याला जास्तच दैवी गोष्टींचा सहारा घ्यावासा वाटला, घरच्यांनी बांधायला गंडे दोरे दिले होते  आणि कसली तरी मोठी पूजा घालायचं मेतकूट घरात कुटले जात होतं पण त्याच्यासाठी प्रचंड खर्च होणार होता.

शेवटी दहावीची परीक्षा आली ह्याने जीवापाड मेहनत केली आणि 45 टक्के घेऊन दहावी पार झाली, घरच्यांना मोठा आनंद झाला की आपला पोरगा नापास नाही झाला. तसा त्याला घरातून काही त्रास न्हवता, घरचे त्याची कुवत जाणून होते आणि कधीही अवास्तव अपेक्षा ठेऊन न्हवते. दहावी झाल्यानंतर त्याला पुढं काय हा प्रश्न पडला, घरच्यांनी आयटीआय करून पुढे नोकरीं चांगली मिळेल असा सल्ला दिला. ह्याने मोठ्या मेहनीतीने तो आयटीआय पण पूर्ण केला, मार्क सर्वसाधारण होते पण कला चांगला शिकला होता. आता नोकरीची वेळ आली त्यावेळी असलेल्या आर्थिक तंगीच्या दिवसात ह्याला नोकरीं काही मिळेना त्याच्यात ह्याची सुका बोंबील सारखी तब्बेत बघून कोणी कामावर घ्यायला पण लगेच तयार न्हवते.

असेच वर्ष गेलं आणि हा घरीच बसून होता. घराच्यांना पुन्हा काळजी वाटली आणि ती  राहिलेली पूजा आठवली पण ती पूर्ण करण्याची ताकत अजूनही त्यांच्यात न्हवती ह्याच्या मनामध्ये पण आता उरली सुरली आशा संपत होती दिवसामागून दिवसा जात होते आणि हा जास्तच उदास होत होता , आपल्याला असलेल्या साडेसातीमुळे आपल्या आयुष्यात काही चांगले होईल का हि शंका त्याला त्रासू लागली आणि एका उदास दिवशी ह्याच्या मनात सगळं संपवायचा विचार आला आणि त्याची पावलं नदीकडे चालू लागली.

तो नदीमध्ये उडी मारणार तोच त्याला कोणा एका मुलीची वाचवा वाचवा म्हणून किंचाळी ऐकू आली, समोर एक तरुण मुलगी बुडत होती पण ह्याला तर पोहता येतं न्हवते पण परोपकारी संस्कार म्हणा किंवा मरायची भीती गेली असल्यामुळे म्हणा ह्याने चक्क तिला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली. पाण्यात पोचल्यावर त्याला लक्षात आलं की पाणी तर खोलच नाही आहे ती मुलगी घाबरून किंचाळत आहे, त्याने तिला धीराने बाहेर काढले, तिला घरी सोडले. हळू हळू त्या दोघांच्या भेटी घाठी वाढू लागल्या, हा आपल्या खचलेल्या मनाने शून्यात हरवल्या सारखा तिच्या समोर जाऊन बसत असे आणि आपल्या नशिबाचे वाभाडे काढत त्याला दोष देत असे. ती पूर्ण पणे त्याच्या विरुद्ध स्वभावाची जीवनाला दिलखुलास पणे सामोरी जाणारी, धाडसी, बबली, खूप  उत्साही आणि प्रचंड धडपडी. तिला त्याच्या स्वभावाचा थांग लागेना आणि एका दिवशी तिने त्याला विचारलं की ''नक्की तुझा प्रॉब्लेम काय आहे ''?, ह्याने उत्तर दिले साडेसाती, जन्मात साडेसाती आहे आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी नकार मिळतो , ती त्याच्यावर मिश्किल हसली.

दुसऱ्या दिवशी त्याला एका वर्कशॉप मध्ये घेऊन गेली, गाड्यांचे स्पेअर पार्ट बनवण्याचं वर्कशॉप होतते, हळू हळू त्याने कामं शिकून घेतलं, सुरवातीला वेळ लागला पण त्याच्यावर लक्ष ठेऊन त्याला पूर्ण पणे ट्रेन करायची जबाबदारी एका व्यक्तीला दिली गेली होती ज्याने ह्याला आपलं सर्व कौशल्य पणाला लावून अगदी तरबेज बनवायचं ठरवलं होतं. ह्याला हौस तशी कमी होती पण काही छोटे छोटे प्रोजेक्ट त्याला देऊन ते यशस्वी होण्यासाठो त्याला समजता मदत करून त्याचा आत्मविश्वास हळू हळू वाढवण्यासाठी नियोजन बद्ध रीतीने प्रयत्न होतं होते आणि दिवसांगाणिक त्याच्या प्रतिभेमध्ये असाधारण असा बदल घडत होता. आता तो कामात अगदी तरबेज झाला होता. वर्ष भरात तो सुपरवायझर झाला, त्याची ती मैत्रीण बाहेरगावी निघून गेली होती आणि भेटीगाठी होत न्हव्हत्या .

एकदा तिचा फोन आला आणि तिला भेटताना तिने त्याला विचारलं अशी किती दिवस दुसऱ्यांची चाकरी करणार. ह्याच्या मनामध्ये तसं काहीच नव्हते तो पठया आपल्या नोकरीवर खुश होता. तिने त्याला स्वतः साठी कामं केलेस तर अजून समाधान मिळेल, असा वर्कशॉप तु पण काढ असा सल्ला दिला. ह्याच्या मनात असा कधी विचारच न्हवता कारण सरड्याची धाव कुंपण पर्यंत. ती त्याला बँकेत घेऊन गेली आणि सरकारी योजने नुसार मिळणाऱ्या कर्जाची माहिती दिली. ह्याच्यामध्ये हिम्मत न्हवती पण तिने शब्द दिला जर काही नुकसान झाले तर जुनी नोकरीं चालूच राहील आणि नुकसान भरपाई ती करेल.

आता ह्याला ताव आलं आणि त्याने सर्व कागदपत्रे जमवून लोनसाठी अर्ज केला, लोन मंजूर झाले आणि ह्याने पण आपला स्वतःचा वर्कशॉप काढला, एमआयडीसि मध्ये अनेक छोट्या उद्योगाना स्पेअर पार्ट पुरवून त्याचा जम चांगलाच बसला आणि काही वर्षातच त्याने अर्ध्याहून जास्त लोन पूर्ण केलं थोडा कारभार पण वाढवला. आता तो कामात खुपच व्यस्त झाला होता, त्याची ती मैत्रीण पण भेटत न्हवती फोन वर पण क्वचित बोलणं होत होत कारण ती जास्तच बिझी असायची. पैसा येतं होता, स्वतः चे घर बांधणे चालू होते आणि एक चारचाकी पण आली होती.

अशीच एकदा ती भेटायला आली ,ती दोघे डिनर साठी भेटली तो खूप उत्साही होता आपल्या कामाबद्दल नवीन नवीन प्रोजेक्ट बद्दल बोलत होता ती त्याच्या कडे बघून मिश्किल हसत होती आणि तिने त्याला एक प्रश्न विचारला   " तुझा प्रॉब्लेम काय आहे.". तो प्रश्न ऐकून तो थांबला आणि तसाच भुताकाळात गेला आणि हसत हसत त्याने उत्तर दिलें ''साडेसाती'', साडेसात वर्षांपूर्वी तु माझ्या आयुष्यात आलीस आणि माझी साडेसाती घेऊन गेलीस , त्याच्या त्या उत्तराने ती दोघेजण दिलखुलास हसले.


Comments

Polular Posts

सत्तेचा घोडेबाजार

मै खेलेगा I

हे सर्व कधी थांबेल का ?

नॉस्टॅल्जिया (Nostalgia)

वेडात मराठे वीर दौडले सात