चला हवा येऊद्या
चला हवा येऊद्या - हास्याची एक अशी पर्वणी जी मला नवीन आठवड्याला सामोरा जाण्यासाठी ऊर्जा देते. गेले अनेक वर्षे मी चला हवा येऊ द्या बघत आहे आणि प्रत्येक एपिसोड्गणिक त्याच्या प्रेमात पडत गेलो आहे. खरच चला हवा येऊद्या ने जनमानसाची नाडी पकडली आहे. इतकी वर्षे हा कार्यक्रम चालत आहे पण त्याचा कंटाळा येत नाही, त्याच्यामध्ये प्रत्येक वेळी एक विविधता बघायला मिळते. ह्या कार्यक्रमाने विनोदाला एक नवी संजीवनी दिलेली आहे.
विनोदावर अनेक कार्यक्रम आले पण ह्यासम हाच. ह्यातिल विनोदाला एक उंची आहे आणि ईतक्या वर्षात ती कोठेही घसरलेली दिसत नाही. त्यात कोठेही अश्लिलता, असभ्यता दिसत नाही. ह्यातिल प्रत्येक पात्र जमिनीला घट्ट धरून, कठीण प्रसंगांना सामोरा जाऊन मोठं झालेला आहे आणि म्हणूनच कदाचित ह्यांच्या विनोदाला करुणेचि झालर पण असते.
अरुण नलावडे लिखित पत्रे ज्या वेळी पोस्टमन काका घेऊन येतात त्या वेळी अनेक सामाजिक विषयावर प्रकाश पडतो. भाऊ कदमचा हसरा, निरागस चेहरा आपल्याला आपली दुखे विसरून हास्याच्या दुनियेत घेऊन जातो. कुशल बद्रीकेची एनर्जी लेवल आपली एनर्जी वाढवते. सागर करंडेची नानाची मीमीक्री एक मास्टरपीस आहे जी तो कधीही वापरून एक वेगळाच माहौल निर्माण करतो. श्रेया बूगडे कोणत्याही भूमिकेत एवढी चपखल बसते की प्रश्न पडतो की ही एवढ्या छोट्या पडद्यावर काय करत आहे. विधर्भवादी भारत गणेशपूरे ज्यावेळी आपल्या केरेक्टर मध्ये घूसतो त्यावेळी समोरच्याला त्याच्या बरोबर वाहवून नेतो.
ह्या सर्वांचा सूत्रधार, एक दिग्गज दिग्दर्शक , लेखक , गायक आणि चार्ली चाप्लीन च्या मार्गावर चालून जगाला हास्याचा खजिना उघडून देणारा डॉ. निलेश साबळे. डॉ तुम्हाला आणि तुमच्या टीम ला तुम्ही देत असलेल्या हास्यपर्वणी साठी मानाचा मुजरा.
हि अशी हवा आयुष्यात येणे खूप गरजेचेच आहे, हि हवा आपणामधील नैराश्य झटकून आपल्याला ताझेतवाने बनवून सोडते, जीवनामधील हास्ययोगाचा आणि कर्मयोगाचा संगम झाला कि आयुष्याला एक नवीन झळाळी येते आणि आपण त्या झळाळीने चमकून जातॊ.
© जितेंद्र मनोहर शिंदे
Comments
Post a Comment