पानिपत : मराठ्यांची शौर्य गाथा

                                                         

14 जानेवारी 1761, पानिपत चा रणसंग्राम म्हणजे मराठ्यांच्या शौर्याची, स्वामीनिष्ठेची, देशभक्तीची, अचाट पराक्रमाची अजरामर गाथा. मराठ्यांनी केलेली पराक्रमाची शर्त, प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आपल्या कर्तव्यासाठी, देश सरंक्षणासाठी स्वतःला झोकून द्यायची वृत्ती ह्यातून दिसून येते. नाना पाटेकरचा प्रसिद्ध डायलॉग 'मराठा मारता है या मरता है ' कदाचित याच रणसंग्रामा वरून आला असेल.

ह्या युद्धाची जर पार्श्वभूमी समजून घ्यायची असेल तर 1758 नंतर पूर्ण उत्तरेत मराठा साम्राज्य एक जबरजस्त ताकत म्हणून उदयास आले होते. मराठ्यांनी लाहोर पर्यंत दौंड मारून अहमदशहा अब्दाली च्या मुलाला हुसकावून लावले होते. दिल्ली चा बादशहा नावापुरता राहिला होता आणि मुघल साम्राज्याचा बिमोड करून मराठ्यांचा डंका पूर्ण उत्तरेवर गाजत होता. रोहील खंडाचा नजीब खान रोहिला आणि अवधचा नवाब सुजाउदोल्ला मराठ्यांना घाबरून होते आणि मराठ्यांची घोडदौड रोखण्यासाठी त्यांनी काबूल वरून अहमदशहा अब्दालीला पाचारण केले. अब्दालीला पण आपल्या मुलग्याच्या पराभवाचा बदला घ्यायचा होता आणि मराठे अफगाण सीमेवर पोचले होते ह्याची धास्ती होती. मराठ्यांना रोखण्यासाठी अब्दाली फार मोठे सैन्य घेऊन पंजाब प्रांतात उतरला आणि त्याने तेथून मराठयांना हुसकावून लावले.


अब्दालीला रोखण्यासाठी पेशव्यांनी आपला पुतण्या सदाशिव भाऊला 50 हजाराची फौज घेऊन उत्तरेला पाठवले. भाऊने उदगीर च्या लढाईत निजामाला पाणी पाजले होते आणि उत्तरेकडील ह्या मोहिमेसाठी भाऊच योग्य सेनापती असेल असे पेशव्यांना वाटले. भाऊचे वय अवघे तीस वर्षे, त्यांना  उत्तरेकडील भौगोलिक परिस्थिती, राजकीय परिस्थिती, हवामान याचा कमी अनुभव होता पण भाऊचा विश्वास दांडगा होता. भाऊंबरोबर पेशव्यांचा पुत्र विश्वासराव होते. पुढे अनेक मराठे सरदार त्यांना येऊन मिळाले त्यामध्ये विंचूरकर, पवार, गायकवाड, शिंदे, होळकर होते. ह्या सगळ्यांच्या फौजा येऊन मिळाल्यामुळे भाऊचे सैन्य लाखाच्या आसपास होते पण भाऊंनी मोहिमे वर जाताना एक फार मोठी घोडचूक केली होती,उत्तरेला जाताना तीर्थक्षेत्रे करता येतील म्हणून त्यांच्या बरोबर हजारोंच्या संख्येने यात्रेकरू सामील झाले होते, सरदारांच्या परिवाराला पण बरोबर घेतले होते. ह्या सर्वांच्या खर्चाची आणि सुरक्षेची जबाबदारी लष्करावर होती. भाऊंकडे सुरवातीला रसद कमी होती आणि उत्तरे कडील राजांकडून मदत मिळेल ह्या आशेने भाऊ निघाले होते.


मजल दरमजल करत सैन्य दिल्लीला पोचले, त्यांनी कुंजपुर्याचा किल्ला घेऊन मोठी रसद मिळवली. त्यावेळी पावसाळा जवळ होता आणि यमुनेला पूर आला होता. ह्या पुरातून अब्दाली यमुना पार करू शकणार नाही ह्या भ्रमात राहून भाऊचे सैन्य पुढे कुरुक्षेत्रा कडे यात्रे साठी निघाले पण अब्दालीने भर पुरात यमुना पार करून तो भाऊंच्या पाठी आला. ह्या परिस्थितीत भाऊंना थांबून पानिपतात मुक्काम करावा लागला, परत दिल्ली गाठणे पण शक्य न्हवते. दोन्ही सैन्य पानिपतात छावणी करून बसले. पण दोघांनींही एकामेकावर हल्ला करणे टाळले. दोघांनीही एकामेकाची रसद मारून एकमेकाला भुके मारण्याचा डाव ठेवला होता. मराठ्यांना सुरवातीला गोविंद पंत बुंदेलाकडून रसद मिळत होती पण अब्दालीने गोविंद पंत बुंदेलांना ठार मारून ती रसद बंद केली. त्यावेळी सुरजमल जाट राजाशी भाऊंचे संबंध बिघडल्यामुळे त्यानेपण मराठ्यांना मदत केली नाही. शीख आणि उत्तरेकडील कोणत्याही राजाने मराठ्यांना मदत करणे टाळले. आता मराठ्यांना उपास मारिला सामोरे जावे लागले.अनेक गुरे अन्न न मिळाल्या मुळे दगावली, सैन्याचा  खर्च सांभाळणे कठीण होऊ लागले होते. त्यात पानिपतातील असह्य थंडी आणि येणाऱ्या रोगराईने अनेक जनावरे आणि सैन्य दगावू लागले. अखेर सर्व सरदारांनी सैन्याला रणागंणावर पाठवूंन युद्धाला समोरा जाण्याचा सल्ला भाऊंना दिला. सुरवातीला अब्दालीला सामोरे न जाता झुंजवत ठेऊन दिल्ली गाठायचा बेत होता. मराठ्यांना सपाट पठारावर समोरासमोर लढाईचा खूप कमी अनुभव होता, मराठे गनिमीकावा (गुरिल्ला वार ) करण्यासाठी जास्त प्रसिद्ध होते, पण शेवटी समोरासमोर युद्ध करण्याचा निर्णय झाला.

14 जानेवारी 1761, मकर संक्रातीच्या दिवशी मराठ्यांचे सैन्य अब्दाली च्या सैन्यापुढे उभे राहिले. सकाळी नऊ वाजता युद्धाला तोंड फुटले आणि दुपारी एक वाजे पर्यंत मराठे सरशीवर होते, मराठ्यांचा मारा इतका प्रचंड होता कि अब्दाली मागे सरकू लागला होता. धोरणानुसार कोणीही मराठा सरदार आत पर्यंत घुसून लढणार नाही असे ठरले होते, इब्राहिम गारदीचा तोफखाना अब्दाली च्या पुढच्या फळीला रोखून धरत होता पण काही अतिउत्साही सरदार आत पर्यंत घुसल्यामुळे घोळ झाला. मराठा सैन्य जिवाच्या आकांताने लढत होते पण दुपारी सूर्य उत्तरायणामुळे तोंडावर आल्यामूळे वीस एकवीस दिवसाच्या उपाशी मराठ्यांना लढाई करणे कठीण होऊ लागले. त्याच रणधुमाळीत विश्वास रावांना गोळी लागली आणि विश्वासराव पडले आणि हाहाकार माजला. भाऊ भावुक होऊन हत्ती वरील अंबारी सोडून घोड्यावर बसून शत्रूवर तुटून पडले. विश्वास राव पडल्यावर आणि भाऊ अंबारीत न दिसल्या मुळे सैन्य भांबावले आणि सैन्यात अफरातफरी माजली. जनकोजी शिंदे भाऊंना जाऊन मिळाले आणि दोघांनी मिळून शेवटचा जबरजस्त मारा केला, पण ह्या रणधुमाळीत भाऊ पडले आणि सैन्याला मोठे खिंडार पडले आणि त्या नंतर झाला एक प्रचंड नरसंहार. दोन्ही बाजूंचे मिळून लाखोने सैन्य आणि यात्रेकरू कापले गेले. मकर संक्रातीचा दिवस एक रक्त रंजित इतिहास लिहून गेला.


पानिपतात कोण जिंकले कोण हरले ह्याची मीमांसा केली तर मराठ्यांच्या पराक्रमापुढे अब्दाली झुकला आणि मराठ्यांचा धाक घेऊन काही दिवसातच भारतातून पळून गेला.

पानिपतात मराठे लढले ते अखंड भारताच्या रक्षणासाठी, अफगाण लुटेऱ्यांपासून देशातील सामान्य जनतेला, स्त्रियांना वाचवण्यासाठी. पानिपतात मराठ्यांनी दाखवलेल्याला स्वामीनिष्ठेला,  जाज्वल्य देशभक्तीला,उतुंग पराक्रमाला इतिहासात तोड नाही.

पानिपतच्या रणसंग्रामात आहुती दिलेल्या सर्व मराठ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

© जितेंद्र मनोहर शिंदे 

Comments

Post a Comment

Polular Posts

सत्तेचा घोडेबाजार

मै खेलेगा I

हे सर्व कधी थांबेल का ?

नॉस्टॅल्जिया (Nostalgia)

वेडात मराठे वीर दौडले सात