मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण

 


आजच्या धावपळीच्या दुनियेत खरंतर मनाचे पण आरोग्य असतें हे आपण समजूनच घेत नाही, आपण शरीराला वेळ देत नाही तर मनाची तर बातच दूर. लहानपणी शाळेत मनाचे श्लोक पाठ केले होते पण त्यांचा अर्थ उमलून घेऊन तो जीवनात उतरवणे किती जणांना जमले असेल. समर्थांनी 205 श्लोक मनाला उद्देशून लिहिले आहेत, प्रत्येक श्लोक म्हणजे जीवन जगण्याचा, मनाला स्थिर ठेवण्याचा मंत्र आहे पण समर्थांच्या श्लोका पेक्षा कुठल्यातरी अमेरिकन किंवा यूरोपयन मनसोपाचार तज्ञाच्या लेख आपल्याला जास्त जवळचा वाटतो. 

संत तुकाराम सांगतात 'मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण '. पण ते मन नेमके काय असतें ते आपण समजूनच घेत नाही. संत रविदास म्हणतात 'मन चंगा तो कठोती में गंगा ' पण चंगा म्हणजे काय? आपल्याला कुठे वेळ आहे त्याला चंगा वैगेरे ठेवायला. तुकाराम महाराज म्हणतात 'नाही निर्मळ मन तर काय करील साबण ' किती जण मनाच्या निर्मळ पणासाठी प्रयत्न करतात. 


श्यामची आई श्यामला तळव्यासारखे मनाला पण मळ लागू नये म्हणून जपायला सांगते पण आपण ते विसरून गेलो आहे. बहिणा बाईंना मन खऱ्या अर्थाने समजले होते 'मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोंर, किती हाकला हाकला फिरून येतं पिकावर . मनाला बांधणे कठीण आहे पण मनाला प्रसन्न करून मनाच्या वरचा बोझ हलका करणे जरुरी आहे. आपल्यासाठी आपल्या मनासाठी थोडा वेळ देणे गरजेचे आहे. मनाला काय चांगले वाटते ते समजून घेऊन मनाला त्यामध्ये रमवणे ही काळाची गरज आहे. कदाचित जुने छंद, फॅमिली, फ्रेंड्स आणि फन आपल्या मनाची गाडी पुन्हा रुळावर आणण्यासाठी मदत करेल. 


सर्वात महत्वाचे म्हणजे मनावर कोणताही भार न ठेवता मन हलके करता आले पाहिजे. आपल्या भावना, व्यथा, अडचणी आणि अपयश जवळच्या माणसाबरोबर शेअर करून खऱ्या अर्थाने मनाला हॉलो आणि एम्पटी बनवणे जरुरी आहे. असे केले तर मग आपण ताजे तवाने होऊन पुन्हा नव्या उमेदीने जगाला समोरे जायला तयार होतो. प्रार्थना केल्याने देव बदलत नाही तर आपण बदलतो. प्रार्थना आणि ध्यान धारणा मनाला स्थिर आणि खंबीर करून येणाऱ्या प्रसंगाना सामोरे जाण्याची ताकत देतात. चला थोडा वेळ स्वतः साठी स्वतःच्या मनासाठी देऊया आणि जीवन सुंदर बनवूया.

© जितेंद्र मनोहर शिंदे 

Comments

Polular Posts

सत्तेचा घोडेबाजार

मै खेलेगा I

हे सर्व कधी थांबेल का ?

नॉस्टॅल्जिया (Nostalgia)

वेडात मराठे वीर दौडले सात